मुंबई प्रतिनिधी | हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा आलेला ऑरेंज अलर्ट आता रेड अलर्ट मध्ये बदलला आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालयांना आज बुधवारी आणि उद्या गुरुवारी अशी दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे सकाळच्या सत्रात शाळेत असलेल्या मुलांना सुखरूप घरी पोचवण्याची जबाबदारी ही संबंधित शाळांना देण्यात आली आहे.
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यातील लोकांना गरज असेल तरच बाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा आपल्या घरीच थांबून पाऊस ओसरण्याची वाट बघावी अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत. मुंबईत मागील दोन दिवसापासून कोसळत असणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच मुसळधार पावसाचा लोकलवर देखील परिणाम झाला आहे.
मुंबईच्या हिंदमाता परिसर, दादर, सायन भागात पाणी साठले आहे. त्यामुळे येथे लोकांना दळणवळण करण्याला अडथळा येऊ लागला आहे. ऐन गणेश उत्सवात पावसाने धारण केलेले रौद्र रूप पाहून अनेकांचा हिरमुडा झाला आहे. तसेच ठाणे रेल्वे स्थानकाच्या दोन्ही गेटवर पाणी साचल्याने प्रवाशांना येण्याजाण्यास अडथळा निर्माण होत आहे.