म्हसवड शहरात मध्यरात्री नंग्या तलवारी नाचवत चोरट्यांची दगडफेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दहिवडी | म्हसवड शहरात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी हातात नंग्या तलवारी घेऊन धुमाकूळ घातला. म्हसवडचे नगरसेवक केशव कारंडे यांच्या घरासह सनगर गल्ली, गुरव गल्ली, मुख्य बाजारपेठ व खंडोबा मंदिर परिसरातील 6 हून अधिक घरांचे कडी-कोयंडा तोडत अज्ञात चोरट्यांनी सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नगरसेवक केशव कारंडे यांच्या घरातून 73 हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले, तर अन्य एकाच्या घरात दागिन्यावर डल्ला मारला आहे. येथील खंडोबा मंदिर लगत राहत असलेले सूर्यकांत कथले यांच्याही घराचा कोयंडा तोडून चोरट्यांनी एक मोबाईल व रोख 2 हजार रुपये लांबवले आहेत. तर गुरव गल्लीतही मध्यरात्री चोरट्यांनी काही ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथील एकाला चोरट्यांची चाहूल लागल्याने त्याने आरडाओरड केल्याने चोरट्यांनी पळ काढला. स्थानिकांनी पाठलाग करून चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनीही त्यांच्या दिशेने दगडफेक करत दहशत निर्माण केली.

तसेच सणगरगल्ली येथील सासणे बोळात सरस्वती महेश ईकारे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील 1 लाख 46 हजारांचा ऐवज लंपास केला. म्हसवड शहरात चोरट्यांनी घरफोडी करुन नंग्या तलवारी नाचवत दहशत निर्माण केली. हा प्रकार शहरातील एका सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून चोरट्यांच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.तपास सपोनि बाजीराव ढेकळे करत आहेत.