धक्कादायक !! साताऱ्यातील हिंदुस्थान फीड्स कंपनीत २०० हून अधिक मजुरांना कोंडले; घरी जाण्यासाठी मजुरांचा आक्रोश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | योगेश जगताप

मंगळवारी रात्री सातारा एमआयडीसी येथील पशुखाद्य बनवणाऱ्या हिंदुस्थान फीड्स कंपनीत कामगार आणि सुरक्षारक्षक यांच्यात किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाली. या बाचाबाचीनंतर दोन कामगारांना गंभीर जखमी केलेल्या धुमाळ (ढमाळ) आडनावाच्या सुरक्षारक्षकालाही बाकी कामगारांनी चांगलाच चोप दिला. यावेळी पोलीस प्रशासनाने आपल्या १० जणांच्या पथकासहित कंपनीतील १०० हून अधिक लोकांच्या आक्रोश करणाऱ्या समुदायाला शांत केलं. “आमच्यावर असाच अन्याय होणार असेल तर आम्हाला या ठिकाणी थांबायचं नाही” असाच पवित्रा या कामगारांनी घेतला असून बुधवारपासून काम बंद करण्याचा इशाराही दिला आहे.

वास्तव परिस्थिती काय? – दरम्यान या घटनेनंतर कामगारांच्या कंपनीतील राहणीमानाची आणि त्यांच्या समस्यांची माहिती घेतली असता धक्कादायक बाब समोर आली आहे. हिंदुस्थान फीड्समध्ये मालवाहतुकीचं काम करणाऱ्या २०० हून अधिक हमालांना मागील २ महिन्यांपासून अधिक काळ कंपनीतच राहण्यास सांगितलं आहे. हे कामगार बिहार आणि काश्मीर राज्याचे रहिवासी आहेत. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून हे कामगार कंपनीमधेच राहत असून यांच्या राहण्याची, स्वच्छतेची, फिजीकल डिस्टन्सिंगची कोणतीच काळजी व्यवस्थितरित्या कंपनी प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही. कामगारांना बाहेर जाता येऊ नये म्हणून गेटवरील सुरक्षारक्षकांमार्फत दबाव टाकण्यात येत असून बऱ्याचदा मारहाणही केली जात असल्याचं मत कामगारांनी व्यक्त केलं.

कामगारांना कोंडलं ? – होय. सरकार आणि प्रशासनातर्फे मागील १५ दिवसांपासून कामगारांना त्यांच्या त्यांच्या राज्यात जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करुन दिली जात आहे. मात्र या कंपनीतील कामगारांना रात्रंदिवस कामासाठी राबायला लावलं जात आहे. आणि घरी जायचा विषय काढला की वेळ मारुन नेली जात आहे. रामचंद्र मंडल यांच्या मते, “आम्हाला मोबाईल आणि टीव्हीवरुन मिळणाऱ्या बातम्यांतून ट्रेन,बस सुरु झाल्याचं समजतं, आमचे दुसऱ्या राज्यातील काही मित्रसुद्धा घरी जातानाचे व्हिडियो पाठवतात, पण ज्यावेळी आम्ही गावाला जायचा विषय काढतो त्यावेळी शहरात कोरोना वाढलाय, तुमच्यात एकाला झाला तर बाकीच्यांनाही त्रास होईल अशा प्रकारे घाबरवलं जातं. राकेशच्या मते, “आम्हालासुद्धा बायका-मुलं आहेत, या अडचणीच्या काळात आम्हालाही त्यांच्यासोबत असावं असं वाटतं मात्र कंपनी फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करुन आमच्याकडून काम करुन घेत असल्याचं तो पुढे बोलताना म्हणाला.

सोशल/फिजीकल डिस्टनसिंग आणि स्वच्छतेचं काय? – लॉकडाऊन काळात कंपन्यांना जर काम सुरु ठेवायचं असेल तर कामगारांची योग्य काळजी घेण्याच्या सूचना सरकारकडून करण्यात आल्या आहेत. मात्र याठिकाणी सोशल डिस्टनसिंगचा पूर्णपणे बोजवारा उडालेला पाहायला मिळाला. एका हॉलमध्ये ५० हून अधिक लोकांची राहण्याची सोय केली गेली असून याच ठिकाणी दुकानसामानही आणून टाकण्यात आलं आहे. एवढ्या लोकांसाठी केवळ एक फॅनची सोय केली असून अनेक खाटांना तर प्लायवूडच्या फळ्याच नसल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं. पाणी भरण्यासाठी दोन नळ असून या दोन्ही ठिकाणी प्रचंड दुर्गंधी पाहायला मिळाली. २०० लोकांसाठी असणाऱ्या टॉयलेट बाथरुमसाठी पाण्याचे नळसुद्धा व्यवस्थित नाहीत. संपूर्ण टॉयलेट बाथरूमचा घाण वास येत असताना अशाच परिस्थितीत राहण्याची शिक्षा या कामगारांना मागील २ महिन्यांपेक्षा अधिक काळ मिळाली आहे. आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जायचं म्हटलं तरी जाऊ दिलं जात नाही असंही कामगार पुढे बोलताना म्हणाले.

मुजोरी नक्की कुणाची? – बाहेरुन आलेले लोक हे कंपनीच्या तुकड्यावर जगतायत आणि दारु पिऊन कंपनीतील मराठी लोकांना त्रास देतायत असा खोटा प्रचार मंगळवारी रात्रीच चालवण्यात आला. पोलिसांदेखत हा विषय वाढू लागल्यानंतर पोलिसांनी कामगारांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आणि बुधवारी सकाळी कंपनीत पुन्हा भेटीला येऊ असं आश्वासन दिलं. कंपनीतील माने नावाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने साताऱ्यातील एका स्थानिक चॅनेलला आमची पॉझिटिव्ह बातमी कर म्हणून कंपनीच्या गेटवरुनच वार्तांकन करायला लावलं. यात त्या बातमीदाराने कामगार मुजोरी करुन कंपनी प्रशासनाला त्रास देत असल्याची धादांत एकांगी आणि खोटी बातमी शूट केली, तेही केवळ ऐकीव माहितीवरुन. ज्याअर्थी कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर सर्व वस्तुस्थिती पाहिल्यानंतर कामगारांच्या जगण्याच्या एकूण परिस्थितीचा जाब विचारला असता निरुत्तर झाले, त्याठिकाणी केवळ फोनवरुन प्रकरणं मॅनेज कशी होऊ शकतात? कामगार वर्ग हा पैशांसाठी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही हाच आक्रोश येथील प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवत होता. अशा परिस्थितीत कामगारांची स्थिती पाहण्याचं सौजन्य ना पोलिसांनी दाखवलं ना कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी. फडके नावाच्या मॅनेजरनी केवळ मी जखमींना दवाखान्यात घेऊन आलोय, बाकी आमची लोकं बघतील तिथलं काय असेल ते म्हणत फोन ठेऊन दिला. ज्या कामगारांच्या जीवावर कंपनी चालण्याची स्वप्नं बाळगली जातात त्या कामगारांशी बोलायला वेळ देण्याऐवजी परप्रांतीय विरुद्ध स्थानिक वाद रंगवण्याला काहीच अर्थ नव्हता.

पुढे काय? – प्रकाश रिशीदेव आणि जयकुमार या कामगारांना सिक्युरिटी इनचार्ज ढमाळ/धुमाळ यांच्याकडून गंभीर मारहाण झाली आहे. या मारहाणीच्या प्रत्युत्तरात सिक्युरिटी इनचार्ज सुद्धा जखमी झाले आहेत. प्रत्यक्ष घटनास्थळावर ते उपलब्ध नसल्याने (कामगारांच्या मते – त्यांनी तिथून पळ काढला) अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. प्रत्यक्ष वार्तांकन सुरु असताना कामगारांच्या निवासस्थानातील लाईट घालवण्याचा प्रकारही घडला. एकूणच या सर्व प्रकरणानंतर कामगारांच्या मनातील घरी जाण्यासाठी असलेली खदखद बाहेर आली आहे. कामगार कायद्याच्या कुठल्याच नियमांत न बसणारं काम (१२ ते १८ तासांचं) या कामगारांकडून करुन घेतलं जात असून या कामगारांनी तात्काळ घरी जाण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. माध्यम प्रतिनिधींना कंपनीच्या आत डोकावण्याची संधीच मिळाली नाही तर आमच्या आयुष्यात काय सुरुय हे कसं समजणार हा जखमी कामगारांनी विचारलेला प्रश्न प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. छोट्या-मोठ्या भांडणानंतर कामगारांना लाडीगोडी लावण्याचा प्रकार होत असेल तर ते कामगारांच्या दीर्घकालीन हितासाठी निश्चितच शोभणारं नाही.

कामगार म्हणतायत..!! – चांगला पगार घेणारे अनेक लोक लॉकडाऊन सुरु झाला की घरी बसले, ५०-६० लोक पळूनसुद्धा गेले, मात्र कंपनीचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही थोडावेळ थांबलो, कळ काढली. पण कंपनीसाठी कुत्र्यागत राबूनसुद्धा आम्हाला हीन दर्जाची वागणूक मिळणार असेल तर आम्हाला ही कंपनी नको आणि हे कामसुद्धा नको. आम्हाला जबरदस्तीने या ठिकाणी कोंडण्यात आलं असून तात्काळ आमची सुटका करावी अशी मागणी या कामगारांनी केली आहे.

या सर्व प्रकारानंतर कंपनी, पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी काय भूमिका घेणार याकडे सातारकर जनतेसोबत महाराष्ट्राचंही लक्ष लागून राहिलं आहे.

 

https://twitter.com/yogeshsjagtap/status/1265377918609309697?s=19

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment