हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राईट हॅन्ड असलेले मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात जाणार अशा चर्चा रंगल्या आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत विधान करत खळबळ उडवून दिली. त्यानंतर नार्वेकर यांच्या एका कृतीने ते शिंदे गटात जाणार कि उद्धव ठाकरेंसोबत राहणार याबाबत थेट संकेत मिळत आहेत.
काल रात्री 10:30 वाजता मिलिंद नार्वेकर हे शिवाजी पार्कात आले होते. यावेळी दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच यावेळी शिवाजी पार्कामध्ये असलेल्या बंगाल क्लब दुर्गोत्सवास भेट दिली. नार्वेकर यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार या चर्चाना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू असून काल रात्री या कामाची पाहणी केली. तसेच येथे असलेल्या बंगाल क्लबच्या दुर्गोत्सवास भेट दिली व माँ दुर्गेचे दर्शन घेतले. pic.twitter.com/hzhh2YBMai
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) October 3, 2022
गुलाबराव पाटील यांनी केला होता दावा-
शिंदे गटातील आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नार्वेकरांबाबत विधान करत खळबळ उडवून दिली होती. बाळासाहेबांचा सेवक थापा शिंदे गटात आला आता मिलिंद नार्वेकर हेदेखील शिंदे गटात येणार असं ऐकायला मिळत आहे असं त्यांनी म्हंटल होत. त्यामुळे नार्वेकर खरच उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार का अशा चर्चाना उधाण आलं होत. मात्र आता खुद्द मिलिंद नार्वेकर यांनीच या ट्विटच्या माध्यमातून या चर्चाना पूर्णविराम दिला आहे.