हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ( ठाकरे गट ) यांची महाविकास आघाडी आहे. ठाकरे गटाने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित सोबतही नुकतीच युती केली आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाची युती आहे. अशा या एवढ्या मोठ्या राजकीय परिस्थितीत एमआयएमने सुद्धा आता महाविकास आघाडीला खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.
एमआयएम नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला ऑफर दिली आहे. एमआयएम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करायला तयार आहे. आमच्यामुळे काँग्रेस – राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणुकीत पडतात असं त्यांना वाटत असेल तर आपण एकत्र निवडणूक लढू. तुम्ही असदुद्दीन ओवैसी यांच्यासोबत बसून चर्चा करावी. आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत, मी यापूर्वीही अशी ऑफर दिली होती. असं जलील म्हणाले. भाजपला रोखायची महाविकास आघाडीची इच्छा असेल तर आम्ही सोबत निवडणुका लढवायला तयार आहोत असे इम्तियाज जलील यांनी म्हंटले आहे.
मुस्लीम समाज म्हणजे आमचीच मालमत्ता आहे, असे अगोदर राजकीय पक्षांना वाटायचे. मुस्लीम समाजाचे मत आमच्याकडून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असा त्यांचा समज होता. पण नंतर तिकडे जाऊ नका असं लोकांना सांगण्यासाठी एमआयएम आली आणि लोक हुशार झाले असे इम्तियाज जलील यांनी म्हंटल.