हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणावरून सध्या सत्ताधारी व विरोधकांच्यात एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. तीन दिवसांच्या अधिवेशनातही आरक्षणाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान आज ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत ओबीसी आरक्षणासंदर्भात ठराव मांडला जाणार आहे. या अनुषंगाने मंत्री छगन भुजबळ यांनी महत्वाची माहिती दिली. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको असा ठराव आजच्या सर्वपक्षीय बैठकीत मांडणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी करीत आजच्या बैठकीत तसा ठरावही आपण मांडणार आहे. आजच्या बैठकीत याबाबात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी सरकार हे एकमताने निर्णय घेतील. आजच्या सरकारच्या रिव्हिव्हयू पिटिशनमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत.
राज्य सरकारच्यावतीने जी रिव्हिव्ह पिटिशन सादर केले जाणार आहे. त्यामध्ये आमच्याशी इतर राज्यांकडूनही सहभाग घेतला जाणार आहे. कारण आपल्यासह मध्यप्रदेश, ओडिसा या राज्यांमध्येही ट्रिपल टेस्टचा निर्णय आलेला आहे. त्यामुळे हि राज्येही सहभागी होतील, असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.