राज्यातील कॉलेज कधी सुरु होणार? उदय सामंत यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेली होती. मात्र, आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. मुख्यमंत्री यांनी शाळा सुरु करण्यास मंजुरी दिल्यानंतर आता, 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होणार आहेत. आता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिवाळीनंतर कॉलेज सुरु करण्याबाबत राज्य सरकार विचार करीत असल्याची माहिती दिली आहे.

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील कॉलेज सुरु करण्यासंदर्भात माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, राज्यात लवकरात लवकर कॉलेज सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. मात्र, दिवाळीनंतर कॉलेज सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. कॉलेज बंद असले तर राज्यातील सीईटी परीक्षा देणारे विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहणार नाहीत.

राज्यातील कोरोनाचा विचार करूनच कॉलेज सुरु होण्याबाबतचा निर्णय घेणार आहे. सध्या मात्र, ऑनलाईन शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा विचार आहे. काही ठिकाणी रुग्णसंख्या कमी झालीय त्या ठिकाणी कॉलेज सुरु करण्याचा विचार आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असून त्या ठिकाणी कॉलेज सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.