हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशात काल पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुपस्थित असल्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, त्याच्या या नाराजीच्या चर्चेवर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी कराड येथे प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार नाराज आहेत अशी चर्चा केली जात आहे. ती खरी नसून ते आजारी असल्यामुळे कालच्या बैठकीसाठी हजर राहू शकले नाहीत. त्यांना काही सांगायचे होते ते मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे त्यांनी सांगितले आहे., असे महाजन यांनी सांगितले.
कराड येथील विमानतळावर मंत्री गिरीश महाजन यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजितदादांनी काल मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना माझ्यासमोर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधला. दोघांनाही त्यांच्या तब्बेतीविषयी माहिती दिली. यावेळी दोघांनीही त्यांना तब्बेतीची काळजी घेण्याचे सांगितले.
यावेळी मंत्री महाजन यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, भाजपसह सत्ताधारी पक्ष येणाऱ्या निवडणुकीत पराभूत व्हावा तसेच यांच्यातील युती तुटावी यासाठी काहीजण देव पाण्यात घालून बसले आहेत, मात्र, तसे काही घडणार नाही. निवडणुकीसाठी सरकार भीत आहे हे म्हणणे चुकीचे आहे. मात्र, निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर करायच्या हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. तो निर्णय आयोग योग्य वेळ आली कि घेईल, असे यावेळी मंत्री महाजन यांनी म्हंटले.