अरंगाबाद – बलात्काराचा आरोप असलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. औरंगाबाद हायकोर्टाने बी समरी अहवाल फेटाळून लावत या प्रकरणात पुन्हा तपास करण्याचे आदेश पोलीसांना दिले आहेत. पोलीस तपासाबाबत न्यायालयाने शंका व्यक्त केल्यानंतर शेख मेहबुब यांच्या अडचणीत वाढ झालेली असतानाच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे शेख यांना संवाद यात्रेत आपल्या बरोबर घेवून बीड जिल्हाभर फिरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येच उलटसुलट चर्चा ऐकण्यास मिळाली. विशेष म्हणजे गेवराई आणि परळी येथील कार्यक्रमात शेख मेहबुब हे व्यासपीठावर मंत्र्यांच्या बाजूलाच स्थानापन्न झालेले होते. व्यासपीठावर शेख यांना पाहिल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी या संदर्भात आश्चर्य व्यक्त करत काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर तशा पोस्टही केल्या आहेत. यामुळे खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बलात्काराचा आरोप असणाऱ्या शेख मेहबूब याला पाठीशी घालत आहेत अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. तसेच आरोप असणारे मेहबूब शेख जिल्हाभर एका मंत्र्यासोबत फिरतात मात्र ते पोलिसांना कसे सापडत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणात शेख मेहबुब यांनी आपली बाजू मांडली असली तरी न्यायालयाने पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात राजकीय दबावाखाली तपासी अधिकाऱ्यांनी तपास केल्याचे दिसत आहे. तक्रारदार तथा पीडितेच्या म्हणण्याऐवजी आरोपीच्या म्हणण्याच्या अनुषंगाने तपास करण्यात आला आहे. तसेच तक्रारदारालाच या प्रकरणात खोटे ठरवण्याचा प्रयत्न केलेला दिसत असून या प्रकरणात आता सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षकांनी तपास करावा . त्यात पोलीस आयुक्तांनी योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन करावे, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ यांनी बी समरी अहवाल न्यायालयात सादर केला होता. या प्रकरणी पीडितेने आपले म्हणणे मांडण्यासाठी ऍंड आय.डी. मनियार यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब ईब्राहिम शेख यांच्याविरुद्ध 28 डिसेंबर 2020 रोजी सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 वर्षीय पीडित तरुणी उच्च शिक्षित असून औरंगाबादेतील बायजीपुरा भागात भाड्याने राहते. नोकरीचे आमिष दाखवून मुंबईला नेण्यासाठी म्हणून 14 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री शेख यांनी कारमध्येच अत्याचार केला. आपण प्रतिकारही केला. मात्र, तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने केलेले आरोप मेहबूब शेख याने समाजमाध्यमावरून प्रतिक्रिया देत फेटाळले होते. पोलिसांनी तपास करून या प्रकरणात कुठलेही तथ्य नसून पीडिता आणि आरोपी यांची भेट झाल्याबद्दलही शंका उपस्थित केली होती. या प्रकरणामध्ये स्वतः शेख मेहबुब यांनी सर्व आरोप फेटाळून लावत आपली नार्को टेस्ट करा अशी भूमिका घेतली होती. या प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ आणि मेहबुब शेख यांच्यात चांगलेच वाक्युध्द रंगले होते. मात्र त्याच दरम्यान न्यायालयाने पोलीसांनी सादर केलेला बी समरी अहवाल फेटाळून लावला आणि या प्रकरणाचे पुन्हा नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले. म्हणजेच या प्रकरणात काही तरी तथ्य न्यायालयाच्या निदर्शनास आली असेल असे असतानाही उजळ माथ्याने मंत्र्यांसमवेत शेख मेहबुब फिरलेच कसे ? असा सवालही काही कार्यकर्त्यांनी केला आहे.