”जितेंद्र आव्हाड तुझा दाभोळकर करू”; सोशल मीडियावर धमक्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना सोशल मीडियावरुन लक्ष्य केलं जात आहे. एका तरुण अभियंत्याने जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट लिहिल्याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप या तरुण अभियंत्याने केला आहे. यामुळे जितेंद्र आव्हाड यांचं नाव चर्चेत असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तरुण अभियंत्याला मारहाण प्रकरणानंतर भाजप आव्हाडांविरोधात आक्रमक असताना आता सोशल मीडियावरही नवं युद्ध सुरू झालं आहे. तुमचा दाभोळकर करू, अशा धमक्या आव्हाडांना दिल्या जात आहेत.

अभियंत्याला मारहाण केल्याच्या आरोपानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोशल मीडियावर अर्वाच्च्य भाषेत टीका होत आहे. जितेंद्र आव्हाडांनी सर्व आरोप फेटाळले असले तरी आम्ही तुमचा दाभोळकर करू, अशा धमक्या त्यांना सोशल मीडियातून दिल्या जात आहेत. दुसरीकडे कुणाचेही चारित्र्यहनन करणे हे खूनाच्या गुन्ह्यासारखेच असते. त्यामुळे भाजपने त्याची जबाबदारी घ्यावी, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. दरम्यान, काही सोशल मीडिया युझर्सकडून जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही खालच्या भाषेत शिवीगाळ केली जात आहे. सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांच्याच नावाने अकाऊंट तयार करुन त्यांना शिवीगाळ केली जात आहे. जितेंद्र आव्हाड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली जावी, अशी मागणी नुकतीच भाजपने केली होती. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणावरुन सोशल मीडिया प्रतिक्रिया उमटत आहेत. यावेळी एका तरुणाने सोशल मीडियावर ‘जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार’ असं म्हटलं आहे. यामुळे सध्या खळबळ उडाली असून पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे.

काय आहे प्रकरण?
५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता देशातील नागरिकांनी घरातील वीज घालवून दिवे किंवा मोबाइल टॉर्च नऊ मिनिटे प्रकाशमान करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. आव्हाड यांनी यावर टीका करणारी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर सिव्हिल इंजिनीअर अनंत करमुसे (४०, रा. आनंदनगर, घोडबंदर रोड) यांनी आव्हाड यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर लिहिली होती. फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर आपल्याला बेदम मारहाण झाली. मारहाणीची घटना आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यात घडल्याची तक्रार सदर अभियंत्याने पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या अभियंत्याचे आरोप फेटाळून लावत “माझ्या बंगल्यावर असा कोणताही प्रकार झाला नाही. या घटनेबद्दल मला माहिती नाही. मी रात्री झोपलेला होतो. त्या दिवशी मी दिवसभर माझ्या विभागात काम करत होतो. त्यामुळे रात्री घरी येऊन झोपलो. मी मारहाणीचे समर्थन करणार नाही, पण त्याने जी पोस्ट माझ्याबद्दल टाकली. तशी पोस्ट कोण सहन करेल? माझा नग्न फोटो टाकला होता. असे फोटो त्याच्या नातेवाईकांबद्दल टाकल्यावर तो गप्प बसेल का? भाजपाचे नेते तरी हे सहन करतील का?,” अशी भूमिका आव्हाड यांनी मांडली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”