औरंगाबाद – ग्रामीण भाग लसीकरणात मागे पडल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने यांनी कंबर कसली असून मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणावर लसीकरनात वाढ झाली आहे. असे असले तरी मात्र ग्रामविकास राज्यमंत्र्यांचा तालुका अद्यापही लाल यादीत असून जिल्ह्यात सर्वात मागे पडल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करायचे असेल तर त्यासाठी लसीकरण अत्यंत गरजेचे आहे. परंतु मागील काही दिवसापासून जिल्हा लसीकरणाच्या बाबतीत अत्यंत मागे असल्याचे पाहायला मिळाले होते. यामुळे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधल्या नंतर जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ऍक्शन मोड मध्ये येऊन सर्वात मागे पडलेला जिल्हा आता अनेक जिल्ह्याच्या बरोबरीने येण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.
जिल्हात ग्रामीण भागात लसीकरण वाढीसाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, विविध विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आता ग्रामीण भागामध्ये दिवसरात्र तळ ठोकून असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरण वाढीसाठी मदत होत असल्याचे देखील समोर येत आहे. सोबतच आरोग्य विभागाला ग्रामीण भागात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक, मंडलाधिकारी देखील मदत करत असल्याचे समोर येत आहे. सिल्लोड तालुका सर्वात मोठ्या असल्याने लसीकरनात मागे पडल्याचे दिसत आहे, परंतु आम्ही गावोगावी कॅम्प लावले असून लवकरच सिल्लोड तालूका लसीकरणात प्रगती करताना दिसेल असे सिल्लोड तालुक्यात नियुक्त केलेले नोडल ऑफिसर शिवराज केंद्रे यांनी सांगितले.
ग्रामविकास महसूल राज्यमंत्र्यांचा तालुका रेड झोन मध्ये –
सध्या राज्यभर चर्चेत असलेले महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा मतदार संघ असलेला सिल्लोड तालुका जिल्ह्यात सर्वात मागे असल्याचे पाहायला मिळत आहे, काही दिवसापूर्वी मंत्री सत्तार यांनी जानकीदेवी बजाज फौंडेशन तर्फे देण्यात आलेले मोफत लसीकरण कॅम्प देखील सिल्लोड सोयगाव मध्ये आयोजित केले होते. लसीकरण वाढीसाठी जिल्हा परिषदेवर वर्चस्व असलेले मंत्री सत्तार आपल्या मतदार संघाला सेफ झोन मध्ये आणण्यासाठी यशस्वी होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.