औरंगाबाद – रस न घेता लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोविन ॲप हॅक करण्याचे प्रकार शहरात सुरूच आहेत. मंगळवारी मनपाच्या बायजीपुरा आरोग्य केंद्रावर तीन जणांनी लस न घेता प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनपा कर्मचाऱ्यांनी हा प्रकार लक्षात घेत तातडीने एका व्यक्तीचे रजिस्ट्रेशन रद्द केले. दोन जणांना प्रमाणपत्र मोबाईल वर गेले. त्यातील एका व्यक्तीने दुपारी लस घेतली तिसरा व्यक्ती आलाच नाही. या प्रकरणी मनपाने जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
शहरातील बायजीपूरा आरोग्य केंद्रात नेहमीप्रमाणे मंगळवारीही लसीकरण सुरू होते. यावेळी 20 नागरिकांना लस देण्यात आली होती. कोवीन ॲपवर लस घेणाऱ्यांची नोंदणी करणाऱ्या शिक्षकाने ॲप मधील नोंदणी तपासले तेव्हा 23 जणांनी लस घेतल्याची नोंद झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रत्यक्षात मात्र, 20 जणांनी लस घेतली होती अतिरिक्त तीन जण आले कुठून असा प्रश्न शिक्षक, कर्मचाऱ्यांना पडला. या घटनेची माहिती आरोग्य केंद्राच्या प्रमुखांना दिली. प्रमुखांनी ही माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांना दिली.
माहिती मिळताच ते आरोग्य केंद्रात दाखल झाले. त्यांनी ॲप वरील नोंदी तपासल्या. लस न घेता प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांचा पत्ता आणि फोन नंबर त्या ठिकाणी होते. कर्मचार्यांनी त्वरीत एका व्यक्तीची ॲप वरील नोंदणी रद्द केली. दोन जणांची नोंदणी रद्द करता आली नाही. त्यामुळे दोघांना संपर्क साधण्यात आला. त्यापैकी एकाने केंद्रावर येऊन गुपचूप लस घेतली. दुसऱ्याने मात्र, टाळाटाळ केली. मी जालन्याला आलो आहे असे सांगितले. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात व सायबर सेलकडे तक्रार दाखल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.