अखेर बेपत्ता शाळकरी मुलगा सापडला पंजाबमध्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील पाडळी येथील अल्पवयीन शाळकरी मुलगा ठाण्याच्या मिरारोड येथून जून महिन्यात बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. मिरारोड पोलिस ठाण्याच्या पोलीस अधिकारी स्नेहल तांबडे यांच्या पथकाने या प्रकरणी कराड परिसरात चौकशी केली होती. दरम्यान मिरारोडच्या पोलीस अधिकारी स्नेहल तांबडे, पोलीस उपनिरिक्षक वंजारी यांच्या पथकाने पंजाब येथे जाऊन चार दिवसात बेपत्ता झालेल्या मुलाला शोधून काढले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सध्या बालसुधारगृहात ठेवले आहे.

कराड तालुक्यातील पाडळी येथील शाळकरी मुलगा साईनाथ चव्हाण हा जून महिन्यात मिरारोड येथे नातेवाईकांकडे गेला होता. तेथून तो अचानक बेपत्ता झाला होता. हे प्रकरण मिरारोड पोलिसांनी अत्यंत गांभिर्याने घेत सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला. पोलीस उपायुक्त अमित काळे, पोलीस निरिक्षक विजयसिंग बागल यांच्या मार्गदर्शनाखाली मिरारोडच्या पोलीस उपनिरिक्षक स्नेहल तांबडे या कराडला तपासासाठी आल्या होत्या. त्यांनी कराड शहर व ग्रामिण पोलिसांच्या मदतीने संबंधित मुलगा कोणाच्या संपर्कात होता? याची चौकशी करत अनेकांचे जबाब घेतले.

तपासावेळी पोलिसांच्या पथकाच्या हाती काही माहिती लागली. त्यानुसार पोलीस उपनिरिक्षक स्नेहल तांबडे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरिक्षक वंजारी, कॉन्स्टेबल पवार, कॉन्स्टेबल हर्णे, कॉन्स्टेबल चकोर यांचे पथक पंजाबला रवाना झाले. पंजाबच्या अमृतसर, गुरूदासपूर भागात शाळकरी मुलाचा कसून शोध घेत त्यांनी घेतला. तसेच पंजाबमधील काही संस्थांशीही त्यांनी संंपर्क साधला. चार दिवसांच्या प्रयत्नानंतर दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेला मुलगा पोलिसांच्या हाताला लागला. मिरारोड पोलिसांनी पंजाबला जाऊन केलेल्या अथक तपासाचे वरिष्ठांनी कौतूक केले. मुलाच्या नातेवाईकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.

याबाबत पोलीस अधिकारी स्नेहल तांबडे म्हणाल्या की, कराडच्या शाळेत शिकणारा मुलगा मिरारोडमधून बेपत्ता झाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. पंजाब राज्यात तो गेला असावा असे धागेदोरे हाती लागल्याने मुलाच्या शोधासाठी आम्ही पंजाबला रवाना झालो. तो तेथे सापडला. तो नेमका कोणत्या कारणासाठी गेला होता याचा तपास वरिष्ठांमार्फत सुरू आहे.