हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे-फडणवीसांचं सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा वारंवार विरोधी पक्षाकडून केला जातो. काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकारबद्दल भाकीत केल्यानंतर अजून एक नेत्याने नवा दावा केला आहे. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार असून विठ्ठलाची पुढची शासकीय महापुजा ही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री करतील. इतकंच नाही तर अजित पवार हे पुढचे मुख्यमंत्री असतील आणि तेच शासकीय पुजा करतील, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.
शिर्डीत आजपासून राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय चिंतन शिबीरास सुरुवात होणार आहे. यासाठी मिटकरी शिर्डीत दाखल झाले असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, फडणवीस हे भविष्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदीही दिसणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यातील मोठा पक्ष आहे.
अजित दादांसारखे नेतृत्व महाराष्ट्राला लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. राज्यातील जनतेच्या मनात रोष आहे. आषाढी आणि कार्तिकीची पूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत असतात. त्यामुळे आता येणाऱ्या कार्तिकीची महापूजा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीच करतील, असा विश्वास यावेळी मिटकरींनी व्यक्त केला.