Sunday, May 28, 2023

विकास काम केलं नाही म्हणणाऱ्यावर शिंदे गटातील आमदाराच्या बहिणीने उचलला हात? साताऱ्यात राजकारण तापलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात गावोगावी राजकीय वातावरण तापलेले पहायला मिळाले. मात्र शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची बहीण डॉक्टर अरुणा बर्गे या क्षेत्र माहुली ग्रामपंचायत निवडणुकीत गाडीत बसुन एका व्यक्तीवर चांगल्याच संतापल्या. त्यामुळे त्याठिकाणी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हाती आलेल्या माहितीनुसार, आमदार महेश शिंदे यांच्या बहीण डॉ. अरुणा बर्गे या क्षेत्र माहुल्या या गावात असताना त्यांची एका तरुणासोबत खडाजंगी झाली. यावेळी तुम्ही गावात विकास कामं केली नाहीत असं तरुण म्हणताच बर्गे यांनी सदर तरुणावर हात उचललण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे साताऱ्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

अरुणाताई बर्गे यांना घडलेल्या प्रकरणाबाबत माहिती विचारली असता त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं आहे. प्रचारानंतर गावात मला काही माणसे भेटली. त्यांच्या सोबत बोलल्यानंतर मी गाडीत जाऊन बसले. त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मला शिवीगाळ केली.. दारू पिऊन माझ्या अंगावर धावून येऊन गाडीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी हात वर केला असं स्पष्टीकरण बर्गे यांनी दिले आहे.