Satara News : आ. मकरंद पाटलांनी लिहिलं थेट मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; साकडे घालत केली ‘ही’ महत्वाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मध्यंतरी पालकमंत्री पदावरून देखील चांगलीच चर्चा केली गेली. पालकमंत्रीपद हे देसाईंकडून आमदार मकरंद पाटील आबा यांच्याकडे जाणार असल्याचे बोलले जात असताना आता आमदार मकरंद पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच एक पत्र लिहले आहे. त्या पत्रातून त्यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण मिळावे, अशी महत्वाची मागणी देखील मुख्यमंत्री शिंदेंकडे केली आहे.

वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना एक पत्र लिहले आहे. त्या पत्रातून आ. मकरंदआबांनी मुख्यमंत्री शिंदेंनी धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण द्यावे, अशी मागणी करीत साकडे घातले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलेल्या पत्रात आ. पाटील यांनी म्हटले आहे, की महाराष्ट्र राज्यात सो १५ टक्के लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे या (एसटी) आरक्षण मिळण्याबाबत या समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

माझ्याही विधानसभा मतदारसंघात धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने आहेत, तसेच ते मेंढपाल व्यवसाय करीत असून, भूधारक व भूमिहीन आहेत. या समाजाची शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे या समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण दिल्यास त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, तरी सकल धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण मिळण्याबाबतचा निर्णय त्वरित घेण्याबाबत आपणास विनंती करीत असल्याचे आ. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे.