सिद्धिविनायक पावला! ‘ED’ला आता प्रताप सरनाईकांना करता येणार नाही अटक; सुप्रीम कोर्टाचा आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ईडीच्या (ED) रडारवर असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना 10 डिसेंबरपूर्वी चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहायचं होतं. मात्र, त्यांच्यावर ईडीकडून अटक होण्याची टांगती तलवार होती. दरम्यान, आज प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. टॉप ग्रुप सिक्युरिटी एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने 24 नोव्हेंबरला प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक यांच्या घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे. (MLA Pratap Sarnaik Protection from arrest by the Supreme Court)

सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या आदेशानुसार, प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर कुठलीही कारवाई करु नये, असे आदेश दिले आहेत. ईडी सरनाईक कुटुंबाला चौकशीसाठी बोलवू शकते. मात्र त्यांना अटक करु शकत नाही, असेही यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान प्रताप सरनाईक यांनी काल (8 डिसेंबर) सहकुटुंब मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. याचे व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले होते. यानंतर आज सर्वोच्च न्यायलयाचा निर्णय आल्याने सरनाईकांना सिद्धिविनायक गणपती पावला! (Siddhivinayak temple mumbai) असे बोललं जातं आहे.

यापूर्वी, ईडीने मंगळवारी (24 नोव्हेंबर) प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आपण परदेशातून आल्याने ८ दिवस आपल्याला सक्तीने क्वॉरंटाईन राहावं लागत आहे.

शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असं सरनाईक यांनी ईडीला कळवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे सरनाईक आज ईडीसमोर चौकशीला हजर राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सरनाईक यांनी ईडीला पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती केली असली तरी अजून त्यावर ईडीने काही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ईडी काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment