हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकारवर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी चांगलाच राडा घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाबाहेर त्यांनी कुजलेल्या सोयाबीनची होळी केली. तसेच कुजलेले सोयाबीन आणि संत्रे फेकून केला सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.
शासनाकडून व सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जात नसल्याने त्यांना नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी आमदार रवी राणा यांच्यासह शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र, त्याकदे दुर्लक्ष होत असल्याने आक्रमक झालेल्या आमदार रवी राणा व त्यांच्या समर्थकांनी जिल्हा नियोजन भवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. तसेच कुजलेल्या सोयाबीनची होळी केली.
यावेळी आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी हेक्टरी ३० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. तसेच जिल्हा नियोजन बैठकीत शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा ठराव मंजूर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्याची मागणी आमदार रवी राणा यांच्याकडून करण्यात आली आहे.