मोदींनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवर मनसेनं केला ‘हा’ परखड सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तब्बल २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मनसेनं आर्थिक पॅकेजवरून भाजपला टोला हाणला आहे. मनसेच नेते संदीप देशपांडे यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

लॉकडाऊनमुळं ठप्प झालेली अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी काल २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. महाराष्ट्रासह भाजपच्या देशभरातील नेत्यांनी मोदींच्या या घोषणेचं जोरदार स्वागत केलं आहे. मनसेचे देशपांडे यांनी भाजपला पीएम केअर फंडासाठी भाजप नेत्यांकडून केल्या गेलेल्या आवाहनांची आठवण करून दिली आहे. ”२० लाख कोटी रुपयांचं पॅकेज देणारे पीएम केअर फंडासाठी (PM Care Fund) एवढी जाहिरात का करत आहेत,” असा बोचरा सवाल मनसेच नेते संदीप देशपांडे यांनी भाजपाला केला आहे.

कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी नव्यानं ‘पीएम केअर फंड’ अर्थात, मदतनिधी सुरू केला आहे. जनतेनं यात योगदान द्यावे, असं आवाहन भाजपकडून सातत्यानं करण्यात येत आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी तर आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना सीएम केअर फंडाऐवजी पीएम केअर फंडात मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यावरून भाजपवर टीकेची झोड उठली होती. मनसेनं आता नेमकं यावरच बोट ठेवलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या कालच्या भाषणाची खिल्ली उडवण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीही मागे राहिली नाही. संकटाचं संधीत रूपांतर करण्याचं आवाहन मोदींनी दरवेळी केलं असून ‘थाळी वाजवा, दिवे जाळा’ असा मोदींच्या या आवाहनाचा अर्थ आहे, असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही मोदींच्या भाषणातील काही शब्द ट्विट करून ‘पैचान कौन?’ असा प्रश्न विचारला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment