हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची वाढती संख्या व नाताळ व न्यू इअरच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत राज्यात जमावबंदीची घोषणा करण्यात आली आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकावर निशाणा साधला. दिवाळीमध्ये रस्त्यावर संख्या वाढली तेव्हा कोरोना कुठे होता. आता रुग्ण संख्या वाढल्याने असे निर्बंध लादून वसुली करण्यासाठी ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वीरप्पन गॅंग पुन्हा सक्रिय झाली आहे, अशी टीका देशपांडे यांनी केली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटोही ट्विट केलेला आहे. त्या फोटोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जय देव जय देव ओमिक्रोन देवा येऊ दे येऊ दे वसुलीचा मेवा,” असे म्हणत ओमिक्रोनच्या फोटोची आरती करताना दिसत आहेत. याबाबत संदीप देशपणे यांनी माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात ओमिक्रोनचे रुग्ण वाढू लागले असल्याने आता वसुली गॅंग पुन्हा व्यापाऱ्यावर कारवाई करण्यास सक्रिय झाली आहे.
विरप्पन गॅंग पुन्हा सक्रिय pic.twitter.com/Zupbib8nZK
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 25, 2021
यापूर्वीही मनसे नेते यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री विधानसभेत जाणार असल्यामुळे वर्षा ते विधान भवन हा रस्ता खड्डे विरहित करण्यात आला. असेच मुख्यमंत्री जर राज्य भर फिरले तर काय मज्जा येईल ना? राज्यभर दौरे कराल का? असा सवाल देशपांडे यांनी ट्विट करीत विचारला होता.