हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोल बंद करून दाखवतो असे मोठं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. मुंबईतील मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मनसेची आत्तापर्यंतची वाटचाल यावर भाष्य केलं.
राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. टोलचा पैसा नेमका जातो कुठं असा सवाल राज ठाकरे यांनी केला. कोणतेही सरकार आपल्याला टोलचा हिशोब देत नाही. मनसेने टोलचं आंदोलनं यशस्वी केलं. ज्या ज्या ठिकाणी आम्ही टोल बंद केले तिथे आपल्याला आशीर्वादच मिळाला आहे असं म्हणत सत्ता हातात द्या सर्व टोल बंद करून दाखवतो असं राज ठाकरे म्हणाले.
आज पर्यंत आपण जेवढी आंदोलन केली तेवढी आंदोलने इतर कोणत्याही राजकीय पक्षाने केलेली नाहीत. आणि यशस्वीही केलेली नाहीत. मनसेमुळेच मशिदीवरील भोंगे बंद झाले, आपण भोंग्याचे आंदोलन यशस्वी केलं. मोबाईलवर यापूर्वी फक्त इंग्रजी आणि हिंदीच ऐकू येत होत, पण मनसेने यासाठी आंदोलन केलं आणि त्यांनतर मराठी भाषा मोबाईलवर ऐकू यायला लागली असेही राज ठाकरेंनी सांगितलं
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या दोन अडीच वर्षां[पासून जे काही राजकारण सुरु आहे ते जनतेसाठी चांगलं नाही. महाराष्ट्रात राजकारणाचा खेळखंडोबा सुरू आहे. यूपी बिहार सारख राजकारण महाराष्ट्रात सुरू झालंय. सगळा सत्तेचा बाजार झाला आहे. कोण कोणत्या पक्षात मिसळते तेच कळत नाही अस म्हणत राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे.