हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून अनेक मतदारसंघाबाबत आढावा घेण्याचं काम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) शरद पवारांच्या बारामती लोकसभा मतदार (Baramati Lok Sabha) संघावर लक्ष्य केंद्रित केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) बारामती मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मेळावा घेत शक्ती प्रदर्शन करणार आहेत. मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मनसेकडून वसंत मोरे यांची बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीसाठी ते बारामतीत आले होते. या बैठकीनंतर वसंत मोरे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, पक्ष संघटन मजबूत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. बारामती शहरात लवकर राज ठाकरे लवकरच कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेणार आहोत, त्यासाठीच मी बारामतीत आलो आहे. तसेच मोरे यांनी निवडणुका लढवणार का या प्रश्नावर मात्र बोलणे टाळले.
बारामतीवर भाजपाचाही डोळा-
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीवर भाजपचे सुद्धा लक्ष्य आहे. गेल्या वर्षभरापासून भाजप बारामती लोकसभेसाठी व्यूहरचना राबवत आहे. भाजपचे अनेक वरिष्ठ नेते बारामतीत दौरे करत आहे. सध्या सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत, परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच फूट पडली असून अजित पवार हे भाजपसोबत आहेत. त्यामुळे आगामी काळात बारामती मध्ये नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहायला हवं. पवार कुटुंबियातील फुटीचा फायदा भाजपला होतो कि शरद पवार पुन्हा सूत्रे फिरवणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.