हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवतीर्था बाहेर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाताना एका महिला कर्मचाऱ्यांना देशपांडेंच्या गाडीचा धक्का लागला. यात सदर महिला कर्मचारी जखमी झाल्या. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत
काल या प्रकरणाची दखल राज्याच्या गृहमंत्रालयानेही घेतली होती. देशपांडे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी दिले होते. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी तिथून जाण्यास सांगितले. तेव्हा पोलीस संदीप देशपांडे याना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी तेथून पळ काढला. या झटापटीत महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का लागून त्या जखमी झाल्या. त्यामुळे संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर संदीप देशपांडे यांनी एक विडिओ शेअर करत आपण महिला कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारचा धक्का दिला नाही असे स्पष्ट केलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य बाहेर येईलच मात्र सरकारच्या दबावामुळे पोलीस आमच्यावर गुन्हे दाखल करत आहेत असा त्यांनी आरोप केला आहे. मी कुठेही पळून गेलेलो नाही आमचा कायद्यावर आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.मी वकीलांचा सल्ला घेत आहे असे संदीप देशपांडे यांनी म्हंटल