वर्धा प्रतिनिधी | नरेंद्र मोदी यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर वर्धा येथे आपली पहिली प्रचार सभा घेतली. यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचा मूळ जनाधार म्हणून ओळखला जाणारा हिंदू मतदार भाजपच्या बाजूने वळवण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी सॉफ्ट हिंदुत्वाला फुंकर घातली आहे. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या धोरणावर टीका करताना, काँग्रेस कसे हिंदू विरोधी आहे असेही पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
हिंदू दहशतवादी आहेत असे म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी देशातील हिंदू जनतेच्या हृदयाला जखमा केल्या म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. जगभर हिंदू समाज शांततेसाठी ओळखला जातो. हिंदूंना दहशतवादी म्हणून या हिंदूंच्या ख्यातीचा काँग्रेसने अपमान केला आहे. देशाचे गृहमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंना दहशतवादी असे संबोधले होते. त्यावेळी देशातील हिंदूंना काय दुःख झाले होते याची मला कल्पना आहे. त्यामुळे अशा हिंदू विरोधी काँग्रेसच्या बाजूने तुम्ही जाऊ नका असे जनतेला आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
एकंदरच नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मूळ विचारधारेला गोंजारण्याचा प्रयत्न आजच्या सभेच्या माध्यमातून केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या सॉफ्ट हिंदुत्वाच्या प्रचारातून देशाची ८४ टक्के हिंदू जनता भाजपच्या पाठीशी उभा राहणार का हे पाहण्यासारखे राहणार आहे. त्याच प्रमाणे काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या सत्तेच्या काळात हिंदू धर्मावर केलेल्या टीकात्मक वक्तव्याचा नरेंद्र मोदी यांनी मोठ्या खुबीने वापर करून घेतला असे म्हणण्यास हरकत नाही. तसेच त्यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस नेते खरपूस समाचार घेणार हे मात्र निश्चित आहे.
इतर महत्वाचे –
वर्ध्यातील सभेत मोदींनी साधला पवारांवर निशाणा…
मोदींनी हे मराठी वाक्य बोलून भाषणाला सुरवात केली
आज मोदींची वर्ध्यात पहिली सभा होणार