हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत अविश्वास ठरावावर भाष्य केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मणिपूर येथील हिंसाचाराबाबत आपली भूमिका मांडली. मात्र मोदींनी केलेल्या भाषणानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला. तसेच नरेंद्र मोदींवर देखील सडकून टीका केली. मणिपूर पेटले असताना त्यावर उपाय न शोधता, हिंसाचार शांत करण्याऐवजी नरेंद्र मोदी निर्लज्जपणे हसत होते अशी टीका राहुल गांधींनी केली. तर मणिपूरमधला हिंसाचार केंद्र सरकार थांबवू शकत होतं, पण सरकारने तसं केलं नाही, हा हिंसाचार सुरूच रहावा अशीच सरकारची इच्छा होती असा गंभीर आरोप देखील राहुल गांधी यांनी केला.
लोकसभेत मंगळवारपासून विरोधकांकडून आणलेल्या अविश्वास प्रस्ताव ठरावावर चर्चा सुरू करण्यात आली आहे. या प्रस्तावामध्ये मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा उचलून धरण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे अडीच तासांच्या भाषणात विरोधकांना उत्तर दिले. मात्र पहिल्या एका तासात मोदींनी मणिपूर हिंसाचाराबाबत भाषण न केल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. मुख्य म्हणजे, या सगळ्यात काँग्रेसने भाजपला धारेवर धरले. राहुल गांधी यांच्याकडून नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करण्यात आली.
यावेळी बोलत असताना, “अधिवेशनात विरोधकांनी मणिपूरमधील सत्यस्थितीचे वर्णन केले. तेथील काय आवस्थेबाबत विरोधकांनी संसदेत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्याची मोदींनी खिल्ली उडवली. ते संसदेत निर्लज्जपणे हसत होते. देशाचा एक भाग पेटत असताना पंतप्रधान मोदींना असे हसणे शोभणारे नाही. विषय पेटणाऱ्या मणिपूरचा होता, काँग्रेस किंवा विरोधकांचा नव्हता. असे असतानाही संसदेत मोदी दोन तास मणिपूरची चेष्ठा करत राहिले” अशी टीका गांधींनी केली.
त्याचबरोबर, “मणिपूर लष्कराच्या हाती द्या, दोन दिवसात हिंसाचार थांबेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत तर त्यांनी लष्कराला पाठवावं. भारतीय लष्कर दोन दिवसात मणिपूरमधील हिंसाचार थांबवू शकते. पण मोदींनी हे करायचं नाही, त्यांना मणिपूर जाळायचं आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये मणिपूरमध्ये असं कधीही घडलं नव्हतं. मी संसदेत जे काही बोललो ते चुकीचं नाही. भारतमाता हा शब्द रेकॉर्डवरून काढण्यात आला” अशी मागणी देखील राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आली.