हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | येत्या 30 डिसेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) आयोध्या दौरा आहे. त्यामध्ये मोदींच्या हस्ते तब्बल पाच वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) , दोन अमृत भारत एक्स्प्रेसचे (Amrut Bharat Express) लोकार्पण केले जाणार आहे. तसेच आयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (International Airport) लोकार्पण सुद्धा नरेंद्र मोदी करणार आहेत. त्यामुळे राम मंदिराच्या उदघाटनाच्या दिवशी येणाऱ्या भाविकांना सोयीचे पडणार आहे.
काय आहे अमृत भारत ट्रेनचे वैशिष्ट्य?
अमृत भारत ट्रेनचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. ही ट्रेन खिशाला परवडेल अश्या दरात असून यामध्ये अद्ययावत सोयी आणि वेगवान प्रवास अशा अनेक सुविधांसह अमृत भारत ट्रेनची निर्मिती करण्यात आली आहे. या ट्रेचा मार्ग हा नवी दिल्ली ते दरभंगा असा असून, या मार्गावर प्रभू श्रीरामांचे जन्मस्थळ अयोध्या ते सीता मातेचे जन्मस्थळ सीतामढी ही दोन्ही स्थानके असणार आहेत. या ट्रेनच्या अनेक चाचण्या झाल्या असून आता याचे लोकार्पण झाले की ही ट्रेन प्रवाश्यांच्या सोयीसाठी खुली करण्यात येणार आहे. दुसरी अमृत भारत ट्रेन हि देशभरातल्या श्रमिक आणि कष्टकरी माणसाला केंद्रबिंदू मानून चालवली जाणार आहे. ही ट्रेन उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, ओडिसा या राज्यातून महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, पंजाब या राज्याकडे चालवली जाणार आहे.
मोदी वंदे भारतचे सुद्धा करणार लोकार्पण –
अयोध्येतील या भव्यदिव्या कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदी पाच वंदे भारत एक्सप्रेसचे सुद्धा उदघाटन करणार आहेत. यामध्ये अयोध्या-आनंद विहार वंदे भारत एक्सप्रेसचे, श्रीमाता वैष्णोदेवी कटरा- नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, कोईम्बतूर-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस, जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि अमृतसर-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.