हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मा. मोहनजी भागवत (Mohan Bhagwat) यांनी नागपुरात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एका कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान सरसंघचालकांना प्रश्न विचारण्यात आला की, संघाच्या कार्यालयावर तिरंगा (Tirangaa) का फडकवला जात नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना मोहन भागवत यांनी मात्र उत्तर टाळत अशा प्रकारचे प्रश्न आम्हाला कोणीही विचारू नये असं म्हंटल आहे.
काय म्हणाले मोहन भागवत?
प्रश्नाचे उत्तर देताना मोहन भागवत म्हणतात की, “लोकांनी आम्हाला हा प्रश्न विचारू नये. दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला आम्ही जिथे असतो तिथे राष्ट्रध्वज फडकवतो. नागपुरातील महाल आणि रेशीम बाग या दोन्ही कॅम्पसमध्ये ध्वजारोहण होते. जिथे देशाच्या सन्मानाचा प्रश्न असतो, राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा प्रश्न असतो, तिथे लढा देण्यासाठी, प्राण पणाला लावण्यासाठी आम्ही तुम्हाला आघाडीवर दिसू,” असे ते म्हणाले. याचदरम्यान त्यांनी संघाच्या स्वयंसेवकांनी राष्ट्रध्वजा प्रति व्यक्त केलेल्या आपल्या भावना आणि राष्ट्रध्वज फडकवताना आलेल्या अडचणींमध्ये स्वयंसेवकांनी बजावलेली भूमिका याबद्दल माहिती दिली.
यावेळी मोहन भागवत यांनी 1933 मध्ये घडलेला एक किस्सा सांगितला. तेव्हा काँग्रेसच्या तेजपूर अधिवेशनादरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू 80 फूट उंच खांबावर ध्वज फडकवत होते. त्याच वेळी तो झेंडा खांबाच्या मधोमध अडकला. यावेळी जवळपास १० हजारांच्या गर्दीतून एक तरुण पुढे आला आणि खांबावर चढून त्याने अडकलेला ध्वज बाहेर काढला. या घटनेनंतर पंडित नेहरूंनी त्या तरुणाला अभिनंदनसाठी दुसऱ्या दिवशी परिषदेला येण्यास सांगितले पण तसे झाले नाही. कारण काही लोकांनी नेहरूंना सांगितले की तो तरुण संघाच्या शाखेत जातो. यानंतर संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना याची माहिती मिळताच त्यांनी त्या तरुणाच्या घरी जाऊन त्यांचे कौतुक केले. या तरुणाचे नाव किशनसिंग राजपूत असल्याचे मोहन भागवत यांनी सांगितलं.
प्रश्न का उद्भवला ?
ऑगस्ट 2013 मध्ये नागपूर येथील कनिष्ठ न्यायालयाने 2001 च्या एका खटल्यातील तीन आरोपींची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली होती. या तिन्ही आरोपी बाबा मेंढे, रमेश कळंबे आणि दिलीप चटवानी यांचा गुन्हा म्हणजे २६ जानेवारी २००१ रोजी नागपुरातील रेशीमबाग येथील आरएसएसच्या मुख्यालयात घुसून प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वज फडकवण्याच्या प्रयत्नात त्यांचा सहभाग होता. त्यामुळेच झेंडावंदनाचा हा प्रश्न उदभवला