संजय राऊत हे पोपट; नवनीत राणांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा आज मुंबईला गेले आहेत . याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याचा उल्लेख बंटी बबली असा केला होता त्यावर प्रत्युत्तर देताना नवनीत राणा यांनी संजय राऊतांना पोपट म्हंटल आहे

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत विचारलं असता संजय राऊत हे पोपट आहेत. रोज सकाळी उठून पत्रकारांपुढे यायचं आणि कोणत्याही विषयांवर भाष्य करणं यात काही तथ्य नाही. आम्ही अपक्ष आहोत पण तुमच्या पक्षाला कोणामुळे मते मिळाली यांचा विचार करा असं नवनीत राणा यांनी म्हंटल. गोव्यात शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मते मिळाली होती. आता महाराष्ट्रातदेखील गोव्यासारखी स्थिती होणार असल्याचे नवनीत राणाने म्हटले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यावर संकटे आली आहेत. तब्बल २ वर्षानंतर ते वर्षावर गेले. एखादा व्यक्ती जर २ वर्ष कामावर गेला नाही तर त्याला कोणी पगार पण देणार नाही पण आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बिनकामाचे पगारी मुख्यमंत्री आहेत, त्यांनी काहीच काम अडीच वर्षात केलं नाही, आणि राज्यातील शेतकऱ्यांना संकटात टाकलं असं नवनीत राणा यांनी म्हंटल. तसेच कोणत्याही परिस्थितीत उद्या सकाळी 9 वाजता मातोश्री समोर आम्ही हनुमान चालीसा पठण करणारच असा पुनरुच्चार त्यांनी केला

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते
संजय राऊत हे सध्या नागपूर दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधताना नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. बंटी आणि बबली मुंबईत पोहोचलेच आहेत तर आम्हाला काही अडचण नाहीये. हे फिल्मी लोक आहेत, स्टंटबाजी करणं मार्केटिंग करणं त्यांचे काम आहे . भाजपाला आता मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज पडत आहे असं टोला त्यांनी लगावला