हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांना मुंबईत धक्का देण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच भाग म्हणून ठाकरेंचे कट्टर विरोधक आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे ठाकरेंचा बालेकिल्ला जिंकण्याची जबाबदारी पक्षाने दिली आहे. याबाबत शिवसेना खासदार विनायक राऊत यांना विचारलं असता त्यांनी राणेंचा उल्लेख पणवती असा केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नारायण राणेंना ज्यांनी जबाबदारी दिली त्यांचे आम्ही आभार मानतो. नारायण राणे आणि पणवती हे समीकरण मुंबईत दिसून आलेलं आहे, सिंधुदुर्गात दिसलं आहे आता पुन्हा एकदा दिसेल त्यामुळे ती जबाबदारी अशीच चालू ठेवा, आम्हाला काळजी करण्याचे काही कारण नाही असा टोला विनायक राऊत यांनी लगावला. तसेच राणेंना एकट्याला नको त्यांच्या सोबत त्यांच्या दोन मुलांनाही घ्या असा चिमटाही राऊतांनी काढला.
राणेंनी कसाही नंगानाच घातलेला चालतो, उद्धव ठाकरेंवर एकेरी टीका ते करतात हे चालत, त्यांचा आमदार गोळीबार करतो ते चालत, हिंगोलीचा त्यांचा आमदार याला आडवं करा असं बोलतो हे त्यांना चालत आणि जर आम्ही यांच्यावर टीका केली तर १५३ च्या नोटीस बजावायच्या असं म्हणत पोलीस आणि प्रशासन यांचा शिंदे सरकार दुरूपयोग करत आहे, असा थेट आरोप विनायक राऊतांनी केला आहे.