हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Central Railway Station । मुंबईतील महत्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या मुंबई सेंट्रलचे आता नामांतर होणार आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना जगन्नाथ शंकर शेठ’ यांचं नाव देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सध्या केंद्र सरकारकडे विचाराधीन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात याबाबत माहिती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्यानंतर महाराष्ट्रासाठी हि आणखी एक गुड न्यूज म्हणावी लागेल.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत हा विषय काढला. आपल्या देशात पहिली रेल्वे आणण्याचे काम नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी केले. त्यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला (Mumbai Central Railway Station) द्यावे, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारकडे मुंबई सेंट्रल स्टेशनचं नामकरण ‘नाना शंकर शेठ’ यांच्या नावावर करावं असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. सध्या हा प्रस्ताव निर्णय प्रक्रियेत आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनचा भव्य पुनर्विकास सध्या सुरू असून, स्टेशन तयार करताना जो आराखडा तयार करण्यात आला आहे, त्या आराखड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे अशी माहिती फडणवीसांनी दिली.
मुंबई सेंट्रल स्थानकाचे महत्व – Mumbai Central Railway Station
मुंबई सेंट्रल हे पश्चिम रेल्वेचे एक महत्त्वाचे टर्मिनल आहे, जे मुंबईला देशाच्या विविध भागांशी जोडते. येथून दिल्ली, अहमदाबाद, जयपूर, सूरत, वडोदरा यासारख्या शहरांसाठी दीर्घ पल्ल्याच्या गाड्या धावतात, तसेच राजधानी एक्सप्रेस आणि शताब्दी एक्सप्रेस सारख्या प्रीमियम गाड्यांचेही येथून संचलन होते. मुंबई सेंट्रल स्थानकाचे ऐतिहासिक, वास्तुशास्त्रीय आणि वाहतूकदृष्ट्या मोठं महत्व आहे. हे स्थानक १८ डिसेंबर १९३० रोजी उघडण्यात आले. त्यावेळी ‘Bombay Central’ म्हणून प्रसिद्ध, असलेले हे स्थानक १९९७ मध्ये ‘Mumbai Central’ झाले. दररोज लाखो प्रवासी या स्थानकाचा वापर करतात, विशेषतः उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी….. मुंबई सेंट्रल स्थानक (Mumbai Central Railway Station) हे व्यावसायिक आणि पर्यटक प्रवाशांचे प्रमुख केंद्र आहे त्यामुळे मुंबईच्या दैनंदिन जीवनात आणि अर्थव्यवस्थेत मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाची महत्त्वाची भूमिका आहे.