मुंबई । देशातील आणि राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालत असून परिस्थिती चिंताजनक होत आहे. राज्यात करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या २ हजाराच्या वर गेली आहे. अशा परिस्थितीत मुंबईत आज दिवसभरात करोनाने ११ बळी घेतले आहेत. तर २०४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर मुंबईतील करोनाबाधितांचा एकूण आकडा १ हजार ७५३ वर पोहचला आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या १११ जणांचाही समावेश असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ४५५ इतकी झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.काल उशिरापर्यंत महाराष्ट्रातील रुग्णसंख्या २ हजार ३३४ होती. त्यामध्ये १२१ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ही संख्या २ हजार ४५५ झाली आहे.
दरम्यान महाराष्ट्रात आणि देशात करोनामुळे होणारे मृत्यू वाढत आहेत. तसंच करोनामुळे देशभरात ३३९ मृत्यू झाले आहेत. मात्र यामध्ये काळजीची बाब ही की करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये दर दुसरा मृत्यू महाराष्ट्रात होतो आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १६० जणांचा मृत्यू झाला आहे. ३६६ पैकी १६० मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातले आहेत. तसंच या १६० पैकी १११ मृत्यू हे मुंबईत झाले आहेत. महाराष्ट्राच्या चिंतेत भर घालणारी ही बातमी आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”