हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबईमधील पर्यटन स्थळे जागतिक नकाशावर पोचवण्यासाठी आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी येत्या 20 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत मुंबई फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलमध्ये मुंबईतील सांस्कृतिक कॅलिडोस्कोप दाखविण्याचा उद्देश आहे. तसेच, मुंबई फेस्टिवलमध्ये अनेक सांस्कृतिक आणि संगीताचे कार्यक्रम, खाद्य फेस्टिवल आणि इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्य म्हणजे, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच शमीर टंडन यांनी संगीतबद्ध केलेल्या थीम सॉंगसह मुंबई फेस्टिव्हलच्या लोगो आणि “सपनो का गेटवे” या थीमचे अनावरण करण्यात आले आहे. यावेळी नृत्यदिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते रेमो डिसूझा यांनी आपल्या डान्स टीमसह मिळून या कार्यक्रमाची शोभा वाढवत नृत्य सादर केले. यानंतर, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा आणि पर्यटन संचालनालयाचे संचालक बी.एन. पाटील यांनी पत्रकार परिषदेत तारखांची घोषणा केली.
यावेळी बोलताना पर्यटन मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “मुंबई फेस्टिव्हल 2024 मुंबईच्या विविध पैलूंचा उत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे आयोजित करण्यात येत आहे. हा महोत्सव मुंबईकरांच्या भावना आणि शहराचा समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा ठळक करणारे अनुभव आणि उपक्रम मांडणार आहे. पर्यटन, विकास आणि सर्वसमावेशकतेला चालना देणे आणि उद्योगात नवीन संधी आणि मार्ग शोधणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.”
दरम्यान, एकतेची भावना जपण्यासाठी आणि मुंबईतील पर्यटन स्थळे जागतिक नकाशावर पोहोचवण्यासाठी येत्या 20 ते 28 जानेवारीदरम्यान मुंबई फेस्टिवल 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवल साठी राज्य सरकारकडून 25 कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये होणाऱ्या या फेस्टिवल मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात आले आहे.