हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जुहू येथील अधीश बंगल्यात अधिकृत बांधकाम असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. या प्रकरणी आज हाय कोर्टात सुनावणी पार पडली. यामध्ये हाय कोर्टाने मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा दिला.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात महापालिकेने कारवाईचे संकेत दिल्यानंतर राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने नारायण राणे यांना तूर्तास दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली असून पालिकेला आदेश दिले आहेत. नोटिशीवर तूर्तास कुठलीही कारवाई नको, असे न्यायालयाने म्हटले आहे.
जुहू येथील निवासस्थानावरील कारवाई रोखण्यासाठी राणेंनी आपल्या कंपनीच्यावतीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. राणेंच्यावतीनं जेष्ठ विधिज्ञ डॉ. मिलिंद साठे तर पालिकेच्यावतीनं जेष्ठ विधिज्ञ आस्पी चिनॉय यांनी युक्तिवाद केला.