हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या कोरोनामध्ये झपाट्याने वाढ होत असून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या दरम्यान आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊन, कोरोना संदर्भात महत्वाचे विधान केले आहे. सध्या रुग्णसंख्या तीन ते चार पटीने वाढत आहे. मुंबईत दिवसेंदिवस ओमिक्रॉन, कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री लॉकडाऊन आणि कोरोना संदर्भात जनतेशी बोलणार असल्याचे पेडणेकर यांनी म्हंटले आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असल्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या दिशेने चालले आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी काळजी घेतली तर लॉकाडाऊन होणार नाही. पण आपल्याकडे वीस हजार हा कोरोनाबाधितांचा आकडा झाला तर केंद्राने दिलेल्या नियमांची पूर्तता करावी लागेल.
केंद्राने दिलेल्या नियमांचे पूर्तता टाळायची असेल तर बाजारातील, लग्नातील गर्दी टाळावी लागेल. कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट आपण थोपवली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सहकार्याने आपण ही लढाई जिंकू शकतो. कोरोना रोखण्यासाठी सोसायट्यांसाठी महापालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्या सोसायटीमध्ये 20 किंवा त्यापेक्षा कोविड बाधित रुग्ण आढळतील ती इमारत सील करण्यात येणार आहे. आतापर्यंत 10 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येत होती, अशीही माहिती पेडणेकर यांनी यावेळी दिली.