हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याकडून हनुमान चालीसा प्रकरणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून राणा दाम्पत्याची पुन्हा चौकशी केली जाणारा असून त्यासाठी 8 जून रोजी हजर राहण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी नोटिसीद्वारे दिले आहेत.
मुंबईत राणा दांपत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर जेव्हा पोलीस राणा दाम्पत्याच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. आम्ही खासदार आमदार आहोत तुम्ही आम्हाला असे थांबवू शकत नाही, असे ते म्हणाले होते. त्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा म्हणून त्यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी आज मुंबई पोलिसांनी राणा दांपत्याला नोटीस बजावली आहे. तसेच दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलीस दोषारोपपत्र दाखल करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या नोटिशीनुसार आता 8 जून रोजी राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे आमदार रवी राणा हे राज्यसभेसाठी मतदान करणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत आता राणा दांपत्यांकडून नेमकी काय प्रतिक्रिया दिली जाणार हे पहावे लागेल.