मुंबई । आरेमधून मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यानंतर राज्य सरकारनं प्रस्तावित केलेली जागा केंद्राची असल्याचं पत्रच केंद्र सरकारकडून राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आलं. त्यानंतर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा जोरदार सामना सध्या पाहायला मिळत आहे. मेट्रो कारशेडच्या जागेबाबत केंद्र सरकारनं राज्याला पत्र पाठवण्यामागं हीन राजकारण आहे. त्या जागेवर 1969 पासून राज्य सरकारचा अधिकार आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच केंद्र सरकार आता या जागेवर दावा सांगत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय.
राज्य सरकारने मेट्रो 3 आणि 6 ची कारशेड कांजूरमार्गला उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा आराखडा फडणवीस मुख्यमंत्री असतानाच आखला होता, असा दावा सचिन सावंतांनी केलाय. अश्विनी भिडे यांनी राज्य सरकारला तेव्हा पत्र पाठवलं होतं. मेट्रो 3 कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा सर्वात उपयुक्त आहे. ही जागा कारशेडसाठी देण्यात यावी, असं त्या पत्रात नमूद करण्यात आल्याचंही सावंत म्हणाले.
फडणवीस येणार गोत्यात?
कांजूरमार्गची जागा घेण्यासाठी 5 हजार 200 कोटी रुपये भरा असं कोर्टानं सांगितल्यांचं फडणवीस म्हणतात. पण तसं काही नसताना हे पैसे कुणाला देण्याची भाषा फडणवीस बोलत होते? असा सवालही सचिन सावंत यांनी विचारला आहे. उलट या जागेमुळं मोठ्या प्रमाणात खर्च वाचणार असल्याचा दावाही सावंत यांनी केला आहे. इतकंच नाही तर फडणवीसांना कांजूरमार्गचा डेपो आरेमध्येच करायचा होता. फडणवीसांना हा डेपो आरेमध्येचं का हवा होता? त्यामागे त्यांचा काय उद्देश आहे? हे आपण लवकरच सांगणार असल्याचा इशाराही सावंत यांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने एकही रुपया न घेता ही जागा MMRDA ला दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, आता केंद्र सरकारने या जागेत मिठागर असल्याचे सांगत त्यावर आपला हक्क सांगितला आहे. केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि व्यापार मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही, असे नमूद करण्यात आले आहे. यापूर्वीही MMRDA चा प्रस्ताव आम्ही फेटाळला होता. त्यामुळे आमच्या परस्पर कारशेड उभारणं चुकीचं आहे. त्यामुळे MMRDA ने या कारशेडचे काम त्वरित थांबवा, असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in