मुंबई । राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातही चिंताजनक बाब म्हणजे एकट्या मुंबईत राज्यातील निम्मे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध वॉकहार्ट रुग्णालयातील २६ नर्स, ३ डॉक्टरांना कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यानंतर वॉकहार्ट रुग्णालयाला कंटेनमेंट झोन घोषित केलं आहे. वॉकहार्ट रुग्णालयातील ओपीडी आणि आपत्कालीन सेवा तात्काळ बंद करण्यात आली आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिलं आहे.
कोरोनाबाधित नर्स आणि डॉक्टरांना रुग्णालयातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या सर्वांची रुग्णालयातील कँटिनमधूनच जेवणाची सोय करण्यात आली आहे. जोपर्यन्त या सर्व नर्स आणि डॉक्टरांची दोन वेळा कोरोना टेस्ट निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत या रुग्णालयात येण्या-जाण्यावर बंदी घातली गेली आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग या रुग्णालयात वाढलाच कसा याबाबत चौकशीचे आदेश दिले गेले आहेत.
दरम्यान, मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या ४९० वर पोहचली आहे. मुंबईत करोनाचे ५७ नवे रूग्ण सापडले असून मृतांचा आकडाही आता ३४ वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे वसई-विरारमधील नालासोपारा येथील पेल्हार येथे राहणाऱ्या ३८ वर्षीय गर्भवती महिलेचा मुंबईतील नायर हाॅस्पीटल मध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान वसईतील मृतांचा आकडाही आता ३ व पोहोचला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”