हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेत्री अमृता अरोरा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर निर्माता दिग्दर्शक करण जोहरने आयोजित केलेली पार्टी चांगलीच चर्चेत आली आहे. या पार्टीला राज्य मंत्री मंडळातील मंत्री उपस्थित होते. असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता. यावरून मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे. “आशिष शेलारांनी आरोप केल्याप्रमाणे सेलेब्रिटी पार्टीत एक कॅबिनेट मिनीस्टर होता तर त्या मंत्र्याचं नाव शेलारांनी जाहिर करावे,” असे आव्हान शेख यांनी दिली आहे.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत निर्माता दिग्दर्शक करण जोहर यांनी एक पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीला एक कॅबिनेट मिनीस्टर गेले होते. कॅबिनेट मिनीस्टरने लोकांच्या कार्यक्रमाला जाऊ नये का?,जर काही चूकीचं झालं असेल तर शेलारांनी थेट नाव घ्यावं. शेलारही मंत्री होते ते लोकांच्या कार्यक्रमाला जात नव्हते का?, असा सवाल शेख यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी शेख यांनी ख्रिसमस आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लागू केलेल्या नियमांबद्दल माहिती दिली. मुंबई शहरात मरिन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया,चौपाट्या याठिकाणी प्रशासनाकडून गर्दी होऊ दिली जाणार नाही. मोकळ्या जागी फटाके फोडण्या वरही निर्बंध असणार आहेत. इयर एन्ड आणि ख्रिसमस करता कोणताही मोठा कन्सर्ट, कार्यक्रम मुंबई शहरात करता येणार नाही. प्रशासनाच्या गाईडलाईन राजकिय पक्षांसह सर्वांनाच लागू असणार असल्याचे शेख यांनी सांगितले.