औरंगाबाद – मनपाच्या तिजोरीमध्ये चालू आर्थिक वर्षात कर वसुलीतून एकूण 61 कोटी रुपयांची भर पडली आहे. यामध्ये मालमत्ता कराचे 47 कोटी 87 लाख तर पाणीपट्टीची 13 कोटी 14 लाख रुपये वसूल केले आहेत. सध्या प्रशासनाकडून कर वसुलीवर विशेष लक्ष देण्यात आले असून, वॉर्डनिहाय कर्मचारी घरोघरी जाऊन कर वसुली करत असल्याची माहिती उपायुक्त अपरणा थेटे यांनी दिली आहे.
मनपाने मालमत्ता कराच्या वसुलीचे 250 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार कर वसुलीचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दीड ते दोन हजार मालमत्ता कर वसुलीसाठी देण्यात आले आहेत. वर्षाभरात या कर्मचाऱ्यांना कराची वसुली करावी लागणार आहे. त्यामुळे कर्मचारी घरोघरी जाऊन कराची वसुली करत आहे. कोरोनामुळे कर वसुलीला वेग देण्यात आला नसला तरी सहा महिन्यात 61 कोटींची वसुली झाली आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे प्रशासनाकडून पुन्हा एकदा कर वसुलीच्या मोहिमेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दर आठवड्याला वार्डनिहाय वसुलीचा आढावा घेण्यात येत आहे. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी कर वसुलीच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कर्मचारी आता कर वसुलीचे काम लक्षपूर्वक करत असल्याचे उपायुक्त थेटे यांनी सांगितले.
मुद्रांक शुल्कापोटी देखील मनपाला 4 कोटी 46 लाख रुपये मिळाले आहेत. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात ऊन मनपाला एक टक्का मुद्रांकशुल्क मिळतो. त्या वर्षी मनपाला महिन्याभरात झालेल्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून एक टक्क्याप्रमाणे 4 कोटी 46 लाख 6 हजार रुपयांचा मुद्रांक शुल्क मिळाला आहे. हे शुल्क मिळाल्याने मनपाच्या तिजोरीतील उत्पन्न वाढले आहे.