औरंगाबाद : कोरोना विषाणू संसर्गाच्या नियंत्रणासाठी निधीची कमतरता असताना महापालिकेने मात्र कोरोनाकाळात हॉटेलिंगवर तब्बल ६१ लाख ८४ हजार रुपये खर्च केल्याचे उघड झाले आहे. शहरातील चार हॉटेलांवर ही रक्कम खर्च करण्यात आली आहे. औरंगाबादेत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर एप्रिलच्या तिसºया आठवड्यापासून शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली.
मे, जून, जुलै, आॅगस्ट असे चार महिने कोरोनामुळे औरंगाबादकरांसाठी कठीण ठरले. प्रामुख्याने जुलै-आॅगस्ट महिन्यात शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. कोव्हिड केअर सेंटर, खासगी व सरकारी दवाखाने हाउसफुल्ल झाले. आॅक्सिजन बेडचा प्रश्नदेखील निर्माण झाला.
या काळात महापालिकेने ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंटचे काम युद्धपातळीवर केले. त्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली होती. शहराच्या एंट्रीपॉइंटवर सुमारे दीड महिना दिवसाचे २४ तास बाहेरगावांहून येणाºयांची कोरोना चाचणी केली जात होती. त्याशिवाय टास्क फोर्स, कंटेन्मेंट झोनसाठीच्या विशेष पथकांचे काम सुरू होते. या कामात प्रामुख्याने वैद्यकीय अधिकारी, दंतरोगतज्ञ, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य कर्मचाºयांचा सहभाग होता.
हे कर्मचारी काम करून घरी गेले, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने या सर्व कर्मचाºयांची शहरात चार हॉटेलांमध्ये राहण्याची, जेवणाची, नाश्त्याची व्यवस्था केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, एक ते दीड महिने या कर्मचाºयांचा मुक्काम हॉटेलात होता. या काळात तब्बल ६१ लाख ८४ हजार रुपये महापालिकेने हॉटेलच्या बिलापोटी मोजले. या खर्चाला १९ मार्च २०२१ रोजी मंजुरीही देण्यात आली. कोरोना काळात हॉटेलवर एवढा खर्च करण्यात आल्यामुळे आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा