गोंदिया प्रतिनिधी । जिल्ह्यातील तिरोडा येथील शहीद स्मारक जवळील नगर परिषदेच्या सार्वजनिक विहिरीत १७ वर्षीय युवकाचे प्रेत आढळून आले होते. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करायला सुरुवात केली होती. पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे गतिमान केल्याने खुनातील आरोपीला २४ तासांत गजाआड करण्यात त्यांना यश आले आहे. ऋषभ करोसिया असं मयत युवकाचे नावं असल्याचे समजते आहे.
दरम्यान ऋषभचा मृतदेह विहीरीतून बाहेर काढल्यानंतर त्याच्या शरीरावर जखमा दिसून आल्या होत्या़. त्यामुळे त्याची हत्या करून त्याचा मृतदेह विहीरीत टाकण्यात आला असावा असा प्राथमीक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला होता़. ऋषभचे वडिल दिलीप करोसिया यांच्या तक्रारीवरून १३ नोव्हेंबरला रात्री १ वाजता खुनाचा गुन्हा दाखल करून ६ संशयीत युवकांना चौकशीकरिता बोलाविले होते.
त्यानंतर रियाज उर्फ राजा रमजान शेख, समीर प्रमोद गडपाल, सौरभ हेमंत गजभिये, कृष्णा रामरतन नेवारे या चार जणांना अटक करून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ऋषभ आणि चार आरोपी यांच्यात शुल्लक वाद झाले होते. त्याचाच राग मनात धरून त्यांनी धारदार शास्त्रानी हल्ला करत ऋषभची हत्या केल्याचे उघड झाले आहे.




