सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्यातील एमआयडीसी परिसरात घरगुती वादातून चुलत्याने 10 महिन्याच्या लहान चिमुकल्याला विहिरीमध्ये टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. शलमोल मयुर सोनवणे असे विहिरीत टाकलेल्या 10 महिन्याचे बाळाचे नाव असून त्याचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर- कोडोलीत दहा महिन्याचे बाळ विहीरीत मृत अवस्थेत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. विहीरीत सापडलेले बाळ हे मयूर मारूती सोनवणे (रा. दत्तनगर- कोडोली, ता. जि. सातारा) यांचे आहे. या प्रकरणाची पोलिसांनी माहिती घेतली असता, मयूर सोनवणे याचा सख्या भाऊ अक्षय सोनवणे या संशयित आरोपीने बाळाला चॉकलेट देतो, असे सांगून घरातून घेऊन आला होता. त्यानंतर त्याने त्या बाळाला विहीरीत टाकून त्याचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
संशयित अक्षय सोनवणे याला त्याचे आई- वडिल त्रास देतात, तर भावाला चांगले म्हणातात. या कारणावरून भावाच्या मुलाला विहीरीत टाकून खून केला आहे. पोलिसांनी बाळाला विहीरीतून बाहेर काढून सातारा जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेले आहे. मयत बाळाचे वडिल मयूर सोनवणे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी अक्षय सोनवणे यास सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.