पुण्यातील मटका व्यावसायिकाचा खून : सातारा पोलिसांकडून 12 तासात 6 जणांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खंडाळा | शिरवळ, (ता. खंडाळा) येथील एका इमारतीच्या टेरेसवर रविवारी दि. 20 रोजी डोक्यात गोळी झाडून एकाचा खून केल्याप्रकरणी सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि शिरवळ पोलिसांनी 6 जणांना 12 तासाच्या आतच  जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांना गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले असून प्राथमिक तपासात आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून हा खून झाला असल्याचे दिसून येत आहे.

शिरवळ येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने उपस्थित होते.

अजय बन्सल पुढे म्हणाले, रविवारी दि. 20 फेब्रुवारी रोजी 7.10 वाजण्याच्या सुमारास अजित सुरेश भटे (रा. लेक पॅलेस, फुल मळा, शिरवळ) यांनी शिरवळ पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक पाटणकर यांना लेक पॅलेस टेरेसवर एक इसम रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती दिली होती. याबाबत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता अज्ञात इसमाने एका व्यक्तीचा गोळी मारून खून केला असल्याचे दिसून आले. याबाबत पोलिस निरीक्षक सतीश आंदेलकर यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाला होता. या घटनेतील संशयितांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि शिरवळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या होत्या.

या घटनेचा तपास सुरू असताना सर्वप्रथम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खून प्रकरणात एक संशयित इसमाचा सहभाग असल्याची माहिती प्राप्त झाली. तो पुणे येथे असल्याचे समजतात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ पुणे येथे रवाना होऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता मोक्कामधील फरारी व त्याच्या पाच साथीदारांनी आर्थिक देवाण घेवाणीच्या कारणावरून संबंधितचा खून केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यातील तिघांना पुणे येथून तर दोघांना फलटण शहरात नाकाबंदी करून जेरबंद केले. तरबेज महंमद सुतार (वय-31, रा. ओमसाई अपार्टमेंट वरखडेनगर, कात्रज, पुणे), विकी राजेंद्र जाधव (रा. वानवडी केदारीनगर, पुणे), शंकर अश्रुबा पारवे उर्फ तात्या (पारवे रा. अंबामाता मंदिर सुखसाखर नगर, बिबेवाडी पुणे), नितीन संषीत पतंगे (रा. अप्पर कोंडवा रोड, साईनगर बिबेवाडी पुणे), राकेश सुरेश गायकवाड (रा. आनंदनगर, मार्केटयार्ड पुणे), किरण बबनराव साळने (रा.आंबेगांव पठार पुणे) अशी जेरबंद केलेल्या संशयितांची नावे आहेत, अशी माहिती अजय बन्सल यांनी यावेळी दिली.