जन्मदात्या वृध्द आईचा खून : जेवणाच्या कारणावरून दारूड्या मुलाकडून कृत्य

सांगली । जेवण चांगले करत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या आईचा दारूड्या मुलानेच लोखंडी फुकणी, दगड व विटांनी मारहाण करून खून केला असल्याची घटना कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे घडली. राजाक्का ज्ञानू जाधव या वृद्ध महिलेचा खून झाला असून याप्रकरणी संशयित आरोपी मुलगा दशरथ ज्ञानू जाधव याला कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे.

दशरथ हा दारूच्या आहारी गेला होता. पत्नीच्या मृत्यूनंतर त्याची आई काबाडकष्ट करून त्याचा व त्याच्या दोन मुलांचा सांभाळ करत होती. सध्या त्याची दोन्ही मुले परगावी असल्याने, तो व आई हे दोघेच पाटील मळ्यात राहत होते. दरम्यान, बुधवारी दुपारपासून दशरथ दारू पिऊन घरात आईला मारहाण करत होता. आज तुला जिवंत ठेवत नाही, असे तो वारंवार म्हणत होता.

सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्याने पुन्हा लोखंडी फुकणी व दगडाने आईला मारहाण केली. या मारहाणीत तिच्या संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा झाल्या. या घटनेची माहिती गणेश विठ्ठल भोसले या तिच्या नातवाला शेजारच्या लोकांनी फोनवरून सांगितली. त्याने तात्काळ घटनास्थळी येऊन आजीला मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.