‘वंचित’ बाबत महाविकास आघाडीचा मोठा निर्णय; प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिवसेना ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) चौथ चाक जोडलं असलं तरी जागावाटपाच्या मुद्द्याचा तेढ अजूनही सुटलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तरीही महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अजून एकमत झालेले नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत वंचित बाबत एकमताने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

नेहरू सेंटरला पार पडलेल्या या बैठकीत शरद पवार, जयंत पाटील, अशोक गेहलोत, रमेश चेन्निथला उपस्थित होते. या बैठकीमध्ये जागावाटपातील अंतिम फॉर्म्युल्यावर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. प्रकाश आंबेडकर यांना कोणताही नवीन प्रस्ताव दिला जाणार नाही असा निर्णय एकमतानं या बैठकीत घेण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीने ४ जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्यामुळे प्रकाश आंबेडकर आता नेमकी काय भूमिका घेतात हे आता पाहायला आहे.

दरम्यान, वंचित आघाडीकडून आलेल्या अटी आणि शर्ती आणि बदलणाऱ्या भुमिकेमुळे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) हैराण होऊन गेली आहे. त्यातच आश्चर्याची बाब म्हणजे प्रकाश आंबेडकर एकीकडे महाविकास आघाडीसोबत जागावाटपाची चर्चा करत असताना बाहेर येऊन काँग्रेसवरच टीका करत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आता महाविकास आघाडीने वंचित बाबत ठोस असा निर्णय घेत वंचित बहुजन आघाडीला आता कोणताही नवीन प्रस्ताव दिला जाणार नाही असं ठरवलं आहे. त्यामुळे हा प्रस्ताव स्वीकारत वंचित महाविकास आघाडीसोबत राहणार कि एकला चलो ची भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.