अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय ; महाविकास आघाडीचा केंद्रावर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे अशी भावना महाविकास आघाडी कडून व्यक्त होत आहे. सरकारी संस्था विकून आत्मनिर्भर होणार आहोत का? असा सवाल करत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारतवर जोर देण्यात आला आहे. पण सरकारी संस्था विकून आत्मनिर्भर होणार आहोत का? असा सवाल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विचारला आहे. देश विकू देणार नाही असं मोदी म्हणायचे पण आता त्यांनीच देश विकायला काढला आहे. महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात काहीच दिसत नाही. केंद्राला सर्वात जास्त कर महाराष्ट्र देतो. पण महाराष्ट्राकडे पाहण्याची त्यांची दृष्टी चांगली दिसत नाही अस बाळासाहेब थोरात म्हणाले.

मी अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधतोय – छगन भुजबळ

अर्थसंकल्पाचा डोलारा हा महाराष्ट्रावर अवलंबून आहे. पण मी अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करतोय, अशी खोचक टिप्पणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा. तसे हे दिल्लीतील बाजीराव आहेत. असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.हा देशाचा अर्थसंकल्प होता की कुण्या पक्षाचा? असा प्रश्नही भुजबळ यांनी विचारला आहे.

हा अर्थसंकल्प म्हणजे विरोधी राज्याला आर्थिक त्रास देणारा – हसन मुश्रीफ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनीही अर्थसंकल्पवरून केंद्रावर टीका केली. केंद्र सरकारकडे महाराष्ट्राचं 38 हजार कोटी रुपयांचं देणं आहे. पण हा अर्थसंकल्प म्हणजे विरोधी राज्याला कशाप्रकारे आर्थिक त्रास दिला जावा, याचं उत्तम उदाहरण आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता त्या राज्यांसाठी आर्थिक लयलूट केली आहे. राजकीय हेतू समोर ठेवत हा अर्थसंकल्प सादर केला गेलाय. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रावर अन्याय करण्यात आल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

Leave a Comment