अजितदादांचा शरद पवारांना दे धक्का!! ‘त्या’ 7 आमदारांनाही फोडलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मधून बंडखोरी करत शिंदे- फडणवीस सरकारशी हात मिळवणी केली आहे. अजितदादांच्या या भूमिकेमुळेच पक्षात उभी फूट पडली असून अजित पवार गट आणि शरद पवार गट असे २ गट पडले आहेत. राज्यातील जवळपास ३५ आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याचे समजत असतानाच आता अजितदादांनी राष्ट्रीय पातळीवर सुद्धा शरद पवारांना (Sharad Pawar) दे धक्का दिला आहे. नागालँडमधील राष्ट्रवादीच्या ७ आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अजित पवारांची पॉवर आणखी वाढली आहे.

इतकेच नव्हे तर, आमदारांसोबतच नागालँडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील अजित पवारांशी हातमिळवणी केली असल्याचे समोर आले आहे. आजच नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वानथुंग ओडियो यांनी अजित पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे. यावेळी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या समवेत ७ आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचे शपथपत्र वानथुंग ओडियो यांनी कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपवले आहे.

महाराष्ट्रसोबत आता नागालँडमधील आमदारांनी देखील अजित पवार यांना पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. याचबरोबर आता शरद पवारांच्या हातातून राष्ट्रवादी निसटत चालल्याची देखील चिन्हे निर्माण झाली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच नागालँडची विधानसभा निवडणूक पार पडली आहे. यामध्ये नामरी नचांग, पिक्टो, एस. तोइहो येप्थो, वाय. म्होंबेमो हूमत्सो, वाय. मानखा ओकोन्याक, ए पोंगशी फोम आणि पी लॉन्गॉन या ७ आमदारांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळविला आहे. यामुळे नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे ताकद आणखीन वाढली होती.

मात्र आता याच आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्याची बातमी समोर आली आहे. नागालँडमधील सर्व आमदारांनी आणि जिल्हाध्यक्षांनी एकत्र येत चर्चा करून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नागालँडमध्ये पक्षाला मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अजित पवार यांची ताकद वाढली आहे. तर शरद पवारांना राष्ट्रीय पातळीवरही धक्का बसला आहे.