हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या गोवा आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकीवरून चांगलेच वातावरण तापले आहे. अशात एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीवरून भाजपकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. या दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. त्यातून त्यांच्याकडून विलीनीकरणाच्या मागणी संदर्भात लवकर निर्णय घ्यावा यासह महत्वाच्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसमधील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसंदर्भात आपण तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे. विलीनीकरणाऐवजी एसटी कर्मचाऱ्यांच्या भत्ते, मूळ वेतनात वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विलीनीकरणाच्या मागणी संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिफारशींचे पत्र पाठवले आहे.
राज्यातील एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा अजूनही सुटलेला नाही. अशात गेल्या अडीच महिन्यापासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणासाठी संप सुरू आहे. त्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य शासनाला तीन सदस्यीय समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते. २० जानेवारीला समितीचा दिलेला १२ आठवड्यांचा कालावधी पूर्ण होणार आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आई परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि विलीनीकरणाच्या मुद्यांवरून संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक घेत चर्चा केली. मात्र, यावर तोडगा निघाला नाही.