हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीच्या निवासस्थानी प्रसिद्ध रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली. देशपातळीवरील अनेक राजकीय परिस्थितीबाबत त्यानी आढावा घेतल्या नंतर पवारांनी देशातील प्रमुख भाजप विरोधी नेत्यांची बैठक उद्या बोलावली आहे. देशातील 15 ते 20 प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहतील. दरम्यान या बैठकी बाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारलं असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
नाना पटोले म्हणाले, पवार साहेबांचा हा काही पहिला प्रयत्न नाही. ज्या ज्या वेळी राजकीय समीकरण बदलतात, राजकारणात वेगळे वारे वाहू लागतात, तेव्हा पवारांनी अशा भूमिका घेतलेल्या आहेत. त्यामुळे यात नवीन काही आहे, असं म्हणणं चुकीचं असल्याचं पटोले यांनी म्हटल. त्यामुळे, उद्याच्या बैठकीत काँग्रेसचे नेते सहभागी होण्याची शक्यता नसल्याचे दिसून येते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या बैठकीबाबत माहिती देताना म्हंटल की सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा अजेंडा शरद पवारांनी ठरवाला आहे. सुरुवातीला मोजक्या पक्षांसोबत पवारांची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर सर्वांना एकत्र कसं आणलं जाईल त्याबाबत सर्व नेते ठरवतील, अशी माहिती मलिक यांनी दिलीय. मंगळवारी पवारांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेससह काही पक्षांचे नेते सहभागी होणार असल्याचंही मलिक यांनी सांगितलं.