हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून महाविकास आघाडी सरकार धोक्यात आहे. शिंदे समर्थक आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सुद्धा अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. अजित पवार काँग्रेस आमदारांनाही त्रास द्यायचे असं नाना पटोले म्हणाले.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पटोले म्हणाले, अजित पवार हे काँग्रेस आमदारांना त्रास देत होते. काँग्रेस मंत्र्यांच्या विभागाला पैसे न देणे, त्यांना त्रास देणे, त्यांना निधी देत नव्हते असे प्रकार होत होते. त्यावर माझं असं मत होतं की असे प्रकार चालणार नाहीत. राज्यातील जनतेसाठी हे सरकार असून कोणत्याही गटासाठी ते नाही, असे आम्ही ठामपणे सांगत होतो असेही नाना पटोले म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी आमची काही तक्रार नव्हती. आमचा व्यवस्थित समन्वय होता. त्यामुळे मविआ सरकारला कोणताही धोका नाही मात्र वेळ पडली तर विरोधी पक्षात बसायचीही आमची तयारी आहे. असे नाना पटोले म्हणाले. दरम्यान, संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडू असं विधान केल्यानंतर काँग्रेस- राष्ट्रवादी मध्ये नाराजी असून दोन्ही काँग्रेसच्या बैठकीचा सिलसिला सुरु झाला आहे.